श्री.प्रदीप देशमुख सर यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील 

चांगु काना ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयातील सहाय्यक शिक्षक 

 श्री.प्रदीप देशमुख सर यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा विद्यालयात ३१      डिसेंबर रोजी संपन्न झाला. या सत्कार समारंभासाठी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे संचालक मंडळ सदस्य श्री. वसंतशेठ पाटील  

 प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते श्री.प्रदीप देशमुख सर यांचा सपत्नीक यथोचित सत्कार सन्मान करण्यात आला. त्याप्रसंगी 

 पाहुण्यांनी त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा व आशीर्वाद दिले. 

            सेवापुर्ती सोहळ्यात उच्च माध्यमिक विभागाचे प्राचार्य श्री.प्रशांत मोरे सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मागील १६  वर्षात देशमुख सरांनी केलेल्या उत्कृष्ट कामांचा उल्लेख केला. कामातील नीटनेटकेपणा, सहकाऱ्यांसोबत असलेली विनम्रता, नियोजनबद्ध काम, दिलेल्या कामात झोकून देण्याची सवय, पेहरावातील नीटनेटकेपणा, त्यांना मिळालेला आदर्श BLO पुरस्कार त्यांच्या अशा अनेक गुणांचा उल्लेख प्राचार्यांनी आपल्या भाषणात केला.

           मराठी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. कैलास सत्रे सर, इंग्रजी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री.संतोष चव्हाण सर, सहशिक्षक श्री.शशिकांत भोसले सर या सर्वांनी श्री.प्रदीप देशमुख सरांविषयी आपले मनोगत व्यक्त करून त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. इंग्रजी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ.नीलिमा शिंदे मॅडम , पर्यवेक्षिका सौ.वैशाली पारधी मॅडम यांनी प्राथमिक विभागातर्फे तसेच उच्च माध्यमिक विभागाच्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांतर्फे देशमुख सरांचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. तसेच या सोहळ्यासाठी मराठी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री.सुभाष मानकर सर, पर्यवेक्षक श्री.अजित सोनवणे सर, पर्यवेक्षिका सौ. स्वाती पाटील मॅडम ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

           प्रदीप देशमुख सर यांनी आपले विचार व्यक्त करताना आपल्या 

  मागील आठवणींना उजाळा दिला. विद्यालयाने दिलेल्या सर्व जबाबदाऱ्या 

 मी प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. सहकाऱ्यांकडून मला माझ्या प्रत्येक कामात साथ मिळाली म्हणूनच हे शक्य झाले. माझ्या 

 संपूर्ण सेवेत माझ्या सहचरणीची साथ मला लाभली असेही ते म्हणाले.

            कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभागातर्फे करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी सहशिक्षक श्री. राजेंद्र गांगरे सर यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले व कार्यक्रमाची सांगता झाली.